Hyderabad Chemical Factory Explosion: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एका केमिकल कारखान्यात मोठा स्फोट झाला. या अपघातात किमान ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १३ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. स्फोटामुळे कामगार १०० मीटर अंतरावर पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणातील पसुमिल्लाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या रियाक्टर युनिटमध्ये हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमी कामगारांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्यापैकी अनेक जण गंभीर भाजले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते अजूनही ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांचा शोध घेत आहेत.
औषध निर्मिती युनिटच्या रियाक्टरमध्ये हा स्फोट झाला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी काम करत आहे. अहवालानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रिअॅक्टरमध्ये वाढलेल्या दाबामुळे हा स्फोट झाला असावा. नेमके कारण शोधण्यासाठी आणि कारखान्यात सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का याचा सविस्तर तपास सुरू आहे.
सिगाची इंडस्ट्रीज फार्मास्युटिकल पावडर बनवते. ते 1989 पासून मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज बनवत आहे. ही पांढऱ्या रंगाची पावडर आहे. त्याला वास किंवा चव नाही. एमसीसीचा वापर औषध आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये केला जातो. सिगाची इंडस्ट्रीजचे हैदराबादसह देशभरात पाच कारखाने आहेत. कंपनीची उत्पादने 65 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर, सिगाची इंडस्ट्रीजचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात 9.89 टक्क्यांनी घसरले. आतापर्यंत ते प्रति शेअर 49.72 रुपयांवर व्यवहार करत आहे
या वर्षी एप्रिलमध्ये गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. मृत झालेले सर्व कामगार मध्य प्रदेशातील होते, जे तिथे फटाके बनवत असत. कारखान्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फटाके साठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. कारखान्याकडे यासाठी परवानाही नव्हता. पोलिसांनी सांगितले होते की प्रथम कारखान्यात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे फटाक्यांना आग लागली. त्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडली. पोलिस आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सांगितले की या स्फोटात कामगारांचे तुकडे झाले. त्यांच्या मृतदेहांचे तुकडे नंतर सापडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी; ऋतुजा घनवट
