कोरोना विषाणू नंतर आता चीन मधून असू शकतो ‘हा’ नवीन विषाणू..

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या हल्ल्यापासून संपूर्ण जग सावरलं देखील नाही त्यातच आता आणखी एक विषाणू पसरण्याचा धोका वाढू लागलाय. त्याचं नाव ‘कॅट क्यू’ व्हायरस (सीक्यूव्ही) आणि हा व्हायरस चीनमध्ये झपाट्यानं पसरतोय. या विषाणूमुळं भारताच्या चिंतेतही वाढ पडली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नं (आयसीएमआर) देखील याबाबत चेतावणी जारी केलीय.

कॅट क्यू व्हायरस म्हणजे काय?

हा विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूच्या श्रेणीत येतो. हा विषाणू डुकरं आणि कुलेक्स डासांमध्ये आढळतो. सध्या चीन आणि व्हिएतनाममध्ये हा विषाणू जास्त आढळून आलाय. आयसीएमआर म्हणते की, भारताच्या परिस्थितीनुसार हा विषाणू येथे सहज पसरू शकतो. कॅट क्यू विषाणू शरीरात संसर्ग वेगानं पसरवू शकतो ज्यामुळं उच्च ताप, मेंदुज्वर आणि मेनिनजाइटिस देखील होतो.

 

भारतातील वैज्ञानिकांनी केलाय अभ्यास

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या संशोधनात असं आढळलं आहे की, भारतात कुलेक्स डासांसारख्या प्रजातीही पसरत आहेत. या विषाणूची प्रतिकृती समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी एक अभ्यास केलाय. आण्विक व सेरोलॉजिकल तपासणीसाठी वैज्ञानिकांनी मानव, डासांच्या तीन प्रजाती व डुकरांच्या तीन प्रजातींच्या नमुन्यांची चाचणी केली.

अभ्यासात काय घडलं

संशोधनात, वैज्ञानिकांना मानवांमध्ये कुलेक्स डासांचा सक्रिय संसर्ग आढळला नाही. तथापि, ८८३ मानवी सीरम नमुन्यांपैकी दोन लोकांमध्ये विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज आढळली आहेत. यावरून असं दिसून येतं की, यापूर्वीही या दोघांना कॅट क्यू विषाणूची लागण झाली होती.

डासांमधे पसरणार्‍या विषाणूचं स्वरूप

नमुना चाचणीत वैज्ञानिकांना हा विषाणू एडीस एजिप्टी डासांसह तिन्ही प्रजातींमध्ये आढळला. वैज्ञानिक म्हणतात की, डासांमुळं भारतातील काही भागात कॅट क्यू विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

अधिक अभ्यासाची आवश्यकता

संशोधकांचं म्हणणं आहे की, भारतीय लोकसंख्येत कॅट क्यू विषाणूचा प्रसार समजून घेण्यासाठी अधिक सीरम नमुन्यांची आवश्यकता असंल जेणेकरून अधिकाधिक डेटावर संशोधन करता येईल.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा