मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना विरुद्ध कंगना रनौत असा संघर्ष सुरु आहे. कंगना सातत्यानं ठाकरे सरकारवर एकामागोमाग एक हल्ले करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेखही कंगनानं केला होता. त्यामुळे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामन्यातून यावर पुन्हा भाष्य केलंय.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात संजय राऊतांनी रोखठोक या सदराखाली ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला आहे. या अग्रलेखात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. राऊतांनी ठाकरे कुटुंबिय हे महाराष्ट्रतला महत्वाचा ‘ब्रँड’ असल्याचं म्हटलंय. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ‘पवार ब्रँड’ म्हणून राऊतांनी संबोधलं आहे.
अग्रलेखात नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
आपल्या अग्रलेखात संजय राऊतांनी लिहिलं कि, ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना राऊतांची भावनिक साद
आपल्या अग्रलेखातून संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. राज ठाकरे हे सुद्धा ‘ठाकरे ब्रँड’चा एक घटक आहेत. ठाकरे घराण्यावर होत असलेल्या हल्ल्यांचा राजा ठाकरेंनासुद्धा भविष्यात फटका बसेल. राज ठाकरेंचे शिवसेनेसोबत मतभेत असू शकतात मात्र ठाकरे ब्रँडचा जोर महाराष्ट्र्रात असायलाच हवा. ठाकरे ब्रॅन्डचं पतन झालं कि, मुंबईचंही पतन होईल, असं मत राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.