मुंबई, २७ मे २०२३ : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर या गाडीची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ही गाडी सुरु करण्याची मागणी होत आहे. आता पुढील महिन्या पासून महाराष्ट्रातून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. तर देशातील २८ राज्यातून वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यापासून धावणार आहे.
महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी वंदे भारत एक्सप्रेस मुंबई-गोवा धावणार आहे आहे.
महाराष्ट्रात कोकण रेल्वे मार्गावरून १६ मे रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आली. मुंबईव ते गोवा १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. आता ही गाडी जून महिन्यात सुरु होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही कमी वेळ या गाडीने घेतला होता.
भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस सध्या २१ राज्यांमधून धावत आहे. बिहार, झारखंड आणि गोव्यामधून ती सुरू झालेली नाही. सरकारने जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पूर्वीकडील राज्यांमध्ये अजून विद्युतीकरण झाले नसल्यामुळे तेथून वंदे भारत एक्स्प्रेस धावू शकत नाही. परंतु आता आसाममधून पुढील आठवड्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
देशात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. त्यानंतर दिल्ली ते जम्मू सुरु झाली होती. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह दक्षिण भारतातून ही रेल्वे धावत आहे. देशातील २१ राज्यांमधून तिचा प्रवास सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर