AFC Asian Cup, 14 जून 2022: भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईनने 4-0 असा विजय मिळवल्यानंतर भारताने ही कामगिरी केली. आता मंगळवारी (14 जून) होणाऱ्या पुढील सामन्यात भारत हाँगकाँगकडून हरला तरी त्याचा पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
भारतीय संघाने एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1964 मध्ये भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर 1984, 2011 आणि 2019 च्या स्पर्धाही खेळल्या.
एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत भारताने कंबोडिया आणि अफगाणिस्तानचा पहिल्या दोन सामन्यात पराभव केला होता. भारताने कंबोडियाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला, तर अफगाणिस्तानला सुनील छेत्रीच्या संघाने 2-1 ने हरवले. सुनील छेत्रीने कंबोडियाविरुद्ध दोन्ही गोल केले. त्याचवेळी छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी अफगाणिस्तानविरुद्ध गोल करण्यात यश मिळवले.
अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर आता भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 128 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 83 गोल केले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत आणि मेस्सीने 86 (162 सामने) केले आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीची नजर मेस्सीच्या जवळ जाण्यावरअसेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































