मुंबई, १५ सप्टेंबर २०२० : राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.
यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील गावनिहाय लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दिवसाला किमान ५० घरांमधील व्यक्तींची पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मलगनच्या सहाय्याने तपासणी करण्यात येईल.
कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कुणाला काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत. जे आजारी आहेत, कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे.
आरोग्य पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेला स्वयंसेवक राहणार आहे. शहर, गावे, पाडे, वस्त्या आणि तांडे इथल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी- कर्मचारी सर्वांचं या मोहिमेत योगदान राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी