बीड : २७ एप्रिल २०२० : कोरोनाविरुद्ध संपूर्ण जग लढत असताना बीड जिल्ह्यातील परळी येथे मात्र क्षुल्लक कारणावरून एकाने तलवारीने नाक कापल्याची घटना समोर आली आहे.
परळी शहरातील मिलिंद नगर येथे शनिवारी (दि.२५) रोजी रात्री ही घटना घडली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फारुक खान पठाण असं जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात चक्क तलवारीने नाक कापण्यात आले. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून तलवारीने रात्री मारहाण केली.
तलवारीने फारुखचं नाक कापण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास परळी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, घरच्या समोरील कठड्यावर बसू न दिल्याचा राग मनात धरून फारुखवर तलवारीने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी