जालना २९ मार्च २०२४ : नोंदणी व मुद्रांक विभागा अंतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये मार्च अखेरीस येणाऱ्या दि.२९,३० व ३१ मार्च २०२४ रोजी असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी सुरु राहणार आहेत. मार्च अखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडून स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करुन मुद्रांक शुल्क भरुन खरेदी दस्ताची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात असते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील १ एप्रिलपासून स्थावर मिळकतीच्या रेडिरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरुन दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करीत आहे व तसा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ देखील व्यक्त करत आहेत.
त्यामुळे दस्त नोंदणीची सुविधा यावर्षी मार्च अखेरीस येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी देखील सर्व सह दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी जनतेच्या सेवेत सुरु ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला असून असा आदेश नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी पारीत केला आहे. तरी जनतेने आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क दुय्यम निबंधक कार्यालयात भरुन करण्याचे आवाहन जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी आर.बी.मुळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी