मुंबई, २० जानेवारी २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबई दौऱ्यात सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या विकासकामांमध्ये मुंबई मेट्रोच्या मार्ग २ ऐ आणि ७ चा देखील समावेश आहे. या दोन मेट्रो मार्गांसाठी १२ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनीही मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. आता हे दोन्ही मेट्रो मार्ग आजपासून ( दि. २०) सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहेत.
मेट्रोच्या ३५ किलोमीटरच्या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ६० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मेट्रो ७ च्या १६.५ किमी मार्गावर प्रवासासाठी ३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर मेट्रो २-ए १८.६ किमी मार्गाच्या प्रवासासाठी कमाल भाडे ३० रुपये असेल. हे दोन्ही मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-३ च्या कॉरिडॉरला जोडलेली आहेत.
मुंबई मेट्रोमुळे प्रवाशांना आता मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचणे सोपे, किफायतशीर आणि जलद होणार आहे. म्हणजेच ट्रॅफिकमुळे आतापर्यंत तासनतास लागत असलेला प्रवास आता काही मिनिटांत होणार आहे. साधारणपणे सकाळी दहिसरहून मुंबईला येताना ३० मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडकल्यासही तेवढाच वाया जातो. मात्र आता नवीन मेट्रो लाईन सुरु झाल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.
या मार्गावर तुमचा अंधेरी पूर्वेकडील गुंदवली स्टेशन ते दहिसर पूर्व असा प्रवास सुरू होईल. यात पहिले स्थानक गुंदवली, त्यानंतर मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाड, राष्ट्रीय उद्यान आणि दहिसर पूर्व हे स्थानक असेल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड