राज्य सरकारने जाहिरातींवर केले १५५ कोटी रुपये खर्च

मुंबई, ५ जुलै २०२१: सरकारांना त्यांनी राबवलेल्या मोहिमा तसेच जनहितार्थ उपदेशा साठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर खर्च करावा लागतो. यामध्ये आरोग्य सेवांपासून ते लोकोपयोगी योजनांचा समावेश असतो. राज्य सरकारने गेल्या १६ महिन्यांमध्ये जाहिरातींवर किती खर्च केला याविषयी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केलेत. त्यामध्ये करोना लसीकरण, शिवभोजन थाळी, निसर्ग चक्रीवादळ याबाबतच्या प्रसिद्धीवर मोठय़ाप्रमाणात खर्च झाल्याची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.
जाहिराती वरील खर्चाचा तपशील
या खर्चात जवळपास १० कोटी रुपये समाजमाध्यमांवर खर्च झाला असून सरकारच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक महिन्याला ९.६ कोटी खर्च झाल्याची बाब समोर आली आहे. यात २०१९ मध्ये २०.३१ कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक १९.९२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. वर्ष २०२० मध्ये एकूण २६ विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण १०४.५५ कोटी खर्च करण्यात आले. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर ५.९६ कोटी खर्च करण्यात आले आहे. तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने ९.९९ कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानावर १९.९२ कोटी, सरकारच्या विशेष प्रसिद्धी मोहिमेवर चार टप्प्यात २२.६५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर ९.४२ कोटी खर्च केले असून यात २.२५ कोटींचा खर्च समाजमाध्यमावर करण्यात आला आहे. राज्य आरोग्य शिक्षण विभागाने १८.६३ कोटी खर्च केले आहेत.  शिवभोजन थाळी योजनेच्या प्रसिद्धी मोहिमेवर २०.६५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सरकारच्या स्थापनेपासून प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ११ डिसेंबर २०१९ ते १२ मार्च २०२१ या १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करून दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा