नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२०: गेली सहा महिने कोरोनाने सर्व जगाला त्रस्त करून सोडले आहे. सर्वांच लक्ष लस केव्हा येते याकडे लागून राहिले आहे. भारतातही काही वेगळे चित्र नाही. भारतातही सर्वांचे लक्ष या लस कडे लागून राहिले आहे. भारतात सध्याच्या स्थितीला ३ लस बनवण्याचे काम चालू आहे आणि याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे सांगितले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. याचबरोबर पुढील ७३ दिवसात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच ही लस सर्वांना मोफत मिळणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, २०२१ च्या अगोदरच ही लस उपलब्ध होणार आहे. २०२१ साल सुरू होण्याच्या तीन महिने अगोदरच ही लस आपण वापरू शकतो असा दावा डॉक्टर हर्षवर्धन यांनी केला आहे.
ते म्हणाले की, “जगभरात कोरोना लस निर्मितीवर भर दिला जात आहे. भारतीय कंपनीने बनवलेली कोरोना लस येत्या वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते. त्यानंतर ही लस परिणामकारक आहे का हे समजू शकेल. तसेच सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया पहिल्यापासूनच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत एकत्रित कोरोनाची लसीचे उत्पादन करत आहे. जेणेकरुन लवकरात लवकर कोरोना लसीची निर्मिती होईल. तर इतर दोन स्वदेशी लस तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीत कमी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाची स्वदेशी लस बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा वर्तवली आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी