नागपूर, १ जुलै २०२३: नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांना मुलांचे स्वागत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र परिस्थिती नेमकी उलट असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे, उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी पहिल्याच दिवशी अनेक शाळांची आकस्मिक पाहणी केल्याने ते स्वतः चक्रावले. सकाळी नऊ वाजता त्या हिवरा बाजार जि.प.शाळेत पोहोचल्या तेव्हा गेटला कुलूप होते.
तयारीसाठी शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहायच्या सूचना असताना शाळा सुनसान होती. अध्यक्ष-उपाध्यक्षांना गेट उघडावे लागले. ही बातमी पसरताच अर्ध्या तासानंतर शिक्षक आले. १०:३० पर्यंत एकही विद्यार्थी आला नव्हता. जि.प.शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढावी यासाठी शासन व अधिकारी अनेक प्रयत्न करतात, मात्र हजारो रुपये पगार मिळविणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थी आले की नाही, याचा फरक पडत नाही, हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले.
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या ४ तहसीलमधील १० हून अधिक शाळांच्या अचानक तपासणीत, अनेक गैरप्रकार समोर आले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा दिलाय. पाचगाव शाळेत मुख्याध्यापकांनी वेळेपूर्वीच शाळा सोडुन टाकली. तारसा जि.प.शाळेत कोकडे आणि राऊत यांनी मुलांसोबत माध्यान्ह भोजन केले.
त्यांनी सांगितले की त्यांनी शाळेचा सर्व परिसर, स्वच्छतागृहे, पोषण आहार, स्वयंपाकघर इत्यादींची तपासणी केली. काही ठिकाणी शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी संतापही व्यक्त केला. यापुढे शाळांची आकस्मिक तपासणी करण्यात येणार असून त्यात अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जि प अध्यक्ष कोकडे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड