मग मनसेचे चार जण का चालत नाहीत; अविनाश जाधव

वसई विरार, दि. १७ जुलै २०२०: शिवसेनावाले आठ-आठ जणांना बरोबर घेऊन आयुक्तांशी चर्चा करतात, ते चालते; मग मनसेचे चार जण का चालत नाहीत, असा सवाल करीत मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी दुपारी राडा केला. या वेळी जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना शिवीगाळ केल्याने या आंदोलनाबाबत वसई-विरारमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

वसई पूर्व येथील वालीव कोविड सेंटर, तसेच इतर ठिकाणचे उपचार आदी प्रश्नांबाबत अविनाश जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची मंगळवारी भेट मागितली होती. आयुक्तांनी केवळ दोनच लोकांना अनुमती दिल्याने अविनाश जाधव, इतर कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर पोस्टरबाजी केली.

मनसेचे पदाधिकारी शिवाजी सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी लॉकडाऊनसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या वेळीसुद्धा मनसेला दूर ठेवले गेले होते. शिवसेना नेते आयुक्तांना भेटतात, तेव्हा त्यांच्याबरोबर ८-१० जण तरी असतात. मग आम्ही चार जण चर्चा करणार असू, तर त्यात गैर काय आहे, असा सवाल जाधव यांनी केला. त्यावर आयुक्त अनुत्तरित राहिले.
हा प्रकार तासभर सुरूच होता. या वेळी जाधव यांच्यासमवेत मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील, जयेंद्र पाटील, शिवाजी सुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी या वेळी धिक्कार आंदोलन केले.

आयुक्त गंगाथरन डी. यांनी हा प्रकार सुरू असेपर्यंत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मनसे पदाधिकाऱ्यांनी, खासकरून जाधव यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. याबाबत गुन्हा दाखल करणार का, असे विचारले असता आयुक्तांनी, मला मराठीतून कोणत्या शिव्या दिल्या त्या समजल्या नाहीत. मात्र मी व्हिडीओ पाहतो. चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा