शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२० : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन. यानिमित्तानं अनेक राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत दादर इथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला सपत्निक भेट देऊन अभिवादन केलं.

पर्यावरणमंत्री आणि बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या बळावर बाळासाहेबांनी मराठी मनावर कायम अधिराज्य केलं असं पवार यांनी ट्विटर वर म्हटलं आहे.अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार आणि राजकीय भाष्यकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व महत्त्वाचं होतं. राजकीय कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या त्यांच्या विजिगीषु वृत्तीचं स्मरण करणं क्रमप्राप्त आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

कोणीही गर्दी न करता सर्वांनी जिथे असाल, तिथून बाळासाहेबांचं स्मरण करून त्यांना मानवंदना द्यावी, असं आवाहनही पेडणेकर यांनी यानिमित्तानं केलं. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे.बाळासाहेब हे आपल्या विचारांवर श्रद्धा असलेले आणि आपल्या विधानांवर ठाम राहणारे नेते होते, असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा