पुणे १३ फेब्रुवारी २०२५: हडपसर येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील गाडीतळ ते गांधी चौकदरम्यान अनधिकृत फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानदारांनी वाढवलेल्या फ्रंट मार्जिनमुळे पादचाऱ्यांसाठीचा पदपथ आणि वाहनांसाठीचा रस्ता व्यापला जात आहे. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि नियमित भाडे भरणाऱ्या विक्रेत्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
महापालिकेने मागील आठवड्यात अतिक्रमणविरोधी कारवाई केली असली, तरीही अनधिकृत विक्रेते उड्डाणपुलाखाली पुन्हा जागा अडवून व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. नियमाने भाडे भरणाऱ्या विक्रेत्यांनी याबाबत अतिक्रमण विभागाकडे लेखी तक्रार केली असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेचा त्रास
या अनधिकृत विक्रेत्यांमुळे वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात, परिणामी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याशिवाय, हे विक्रेते भाजी विक्री केल्यानंतर कचरा तिथेच टाकत असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे.
व्यावसायिक संघटनांची मागणी
“अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करून केवळ परवाना असलेल्या विक्रेत्यांनाच हक्काची जागा द्यावी,” अशी मागणी पथारी व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांनी केली.
“पालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी हप्ते घेत असल्यामुळेच कारवाई होत नाही,” असा गंभीर आरोप भाजी विक्रेते नरेंद्र गायकवाड यांनी केला.
यावर प्रशासन काय भूमिका घेते आणि यावर कायमस्वरूपी तोडगा निघतो का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे