अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा, भाजपचे १२ आमदार निलंबित

मुंबई, ६ जुलै २०२१: कालपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीय. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापलं आहे. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आघाडी सरकारचे आमदार आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. यावेळी काही आमदारांकडून शिव्यागाळ केला असल्याचा देखील आरोप केला गेला. एकंदरीत परिस्थिती पाहता अध्यक्षांनी सभागृहाचं काम काही काळासाठी तहकूब केलं. यानंतर अध्यक्षांच्या दालनात जोरदार गदारोळ झाला.

नवाब मलिक यांनी केला व्हिडिओ शेअर

राड्याचा हाच व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केलाय. भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात कशाप्रकारे राडा घातला, असं सांगत मलिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केलाय. त्यानंतर या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडं केली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानंतर आवाजी बहुमतानं भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा