नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आपल्या पदाचा धडाकेबाज एंट्रीने आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
पदाचा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळालं.
कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी आपल्या कामाला सुरूवात केली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांसमवेत ५० मिनिटांची एक बैठकही घेतली. तसंच कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळाली आहे. मिटींगदरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याचे फोन वाजता कामा नये, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीनंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नेहमीच सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालक पदावर होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत येणार हे समजल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला होता. तसंच अनेक कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात हजर राहत असल्याचंही समोर आलं होतं.
सध्या मुंडे यांची भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कधीही नियमबाह्य गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळेच राजकरण्यांना ते नेहमीच खुपतात.