जालन्यातील मौजे काचरेवडी येथे तूर शेती दिन आणि पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

27

जालना २८ डिसेंबर २०२३ : शेतकऱ्यांनी तुरीकडे नगदी पीक म्हणून बघावे असे प्रतिपादन जालन्याचे जिल्हा कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने मौजे कचरेवाडी, ता. जालना आयोजित तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी कचरेवाडी गावाचे सरपंच प्रवीण ससाणे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.पी.एल.सोनटक्के आणि कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. श्रीकृष्ण सोनुने, कृषि अभियंता पंडित वासरे, धानुकाचे जिल्हा व्यवस्थापक दीपक नरवाडकर यांची उपस्थिती होती.

कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमात बोलतांना कापसे म्हणाले की, कृषि विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचा विकास करून आपला आर्थिक स्तर उंचवावा व आपली प्रगति साधावी. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने तूर उत्पादन घेण्याऐवजी कृषि विज्ञान केंद्राच्या मदतीने सामुहिकपणे बिजोत्पादन कार्यक्रम राबविल्यास त्यातून 20 ते 25 टक्के अधिक आर्थिक लाभ होईल असे ते म्हणाले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राद्वारे 60 शेतकऱ्यांच्या शेतावर तुरीच्या बीडीएन-७११ आणि बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) या तुरीच्या सुधारित जातीची प्रात्याक्षिके देण्यात आली आहेत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कचरेवाडी आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी