पुरंदर दि.३१ मे २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नीरा गावांमध्ये शनिवारी( दि.३०)रोजी एकाच कुटुंबातील चुलत भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत शनिवारी रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यामध्ये शाम रतन माने व बापु ज्ञानोबा माने हे गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले असून शनिवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही गंभीर जखमींवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री उशिरा शाम रतन माने यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३० रोजी सकाळी आठच्या सुमारास अनिल माने हे आपल्या घरासमोर मोरीमध्ये आंघोळ करताना एका पाळीव डुकराने आंघोळीच्या पाण्यात तोंड घातले. अनिल माने यांनी बडबड करत यांची काहीतरी सोय करा, असे आपल्या चुलत भावाला सांगितले. मात्र यातून मोठा वाद झाला. त्याचे रूपांतर मारामारीत झाले.
डुकराचे मालक असलेल्या अविनाश माने, गणेश माने,अजय माने, संतोष जाधव,अश्विनी जाधव यांनी शाम माने व त्यांचे कुटंबीयांना मारहाण केली. याबाबतची तक्रार अनिल माने यांनी दिली या संदर्भात जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०६,३२६,३२४ ३२३,१४७,१४८,१४९,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी अंकुश माने याच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय वाघमारे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे













































