औरंगाबाद, १० जानेवारी २०२३ : कन्नड (जि. औरंगाबाद) येथील संभाजी कॉलनीत असलेल्या सानेगुरुजी विद्यालयातर्फे रायगड जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी सहल काढली होती. इयत्ता दहावीच्या वर्गातील ७८ विद्यार्थी व ८ शिक्षक असे एकूण ८६ जण कन्नड येथून शुक्रवारी (ता. सहा) रात्री अकराच्या सुमारास एसटी महामंडळाच्या दोन बसमधून रायगडकडे निघाले होते. यावेळी सहा विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थ्यांना सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की सोमवारी (ता. नऊ) औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सानेगुरुजी विद्यालयाची सहल मुरुड हद्दीत काशीद गावाच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर आली. शाळेचे विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात खेळायला गेले असताना, ७८ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी पाण्यामध्ये खेळत असताना बुडाले. त्यावेळी आरडाओरड झाली. बुडालेले चार विद्यार्थी लगेच सापडले; मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ बसमधून जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र दोन विद्यार्थी बेपत्ता असल्याने स्थानिकांच्या मदतीने त्यांचे तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता दोन्ही विद्यार्थी सापडले. त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे नेले असता, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची नावे प्रणव सजन कदम (वय १५) आणि रोहन बेडवाल (वय १५) असे असून, कृष्णा विजय पाटील, तुषार हरिभाऊ वाघ, रोहन दिलीप महाजन, सायली मनोज राठोड असे वाचलेल्या विद्यार्थ्यांची नाव असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात असून, दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना घडली.
दरम्यान, कन्नड साने गुरुजी विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील