माढा, सोलापूर २७ डिसेंबर २०२३ : उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत असून सद्याची टक्केवारी १७.७९% आहे. यातुन आणखी पाणी सोडल्यास उजनी काठावरील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यासाठी या पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शासनाच्या टेल टू हेड च्या नियमानुसार उजणी धरणाच्या वरील धरणातून १० टी एम सी पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी डिसेंबर अखेर धरण १००% भरलेले होते. सध्याची परिस्थिती बिकट आहे. शासनाच्या नियमानुसार उजनी धरण भरल्यानंतर वरील धरणामध्ये पाणी साठा करणे गरजेचे असताना सुद्धा वरील धरणे आधी १००% भरून घेतले जातात तत्यामुळे वरील धरणांमधून १० टी.एम.सी. पाणी सोडण्यात यावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. कालवा सल्लागार समिती व उजनी धरण व्यवस्थापनाच्या ढीसाळ नियोजनामुळे एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशोबी पाण्यामुळे धरण ६६% वरून डिसेंबर मध्येच १७.६९% टक्क्यावर आले आहे. यामुळे नदी काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. तरी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची पाळी राखीव ठेवावी या मागणीचा विचार करून शासन स्तरावर हि मागणी मांडावी असे निवेदन सुरेश पांडुरंग पाटील अध्यक्ष माढा तालुका उजनी धरणग्रस्त संघटना यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.
अध्यक्ष सुरेश पाटील यांनी हे निवेदन उजनी धरण व्यवस्थापन विभाग आणि उपविभागीय अधिकारी माढा यांना दिले. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर आणि जल बोर्ड महाराष्ट्र राज्य यांना पाठविल्या आहेत. यावेळी टाकळी टे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कळसाईत, अजित घाडगे हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील