काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, सायकल वर जाणार विधानभवनात

मुंबई, १ मार्च २०२१: सध्या देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडालेला आहे. इंधना बरोबरच आता इतर गोष्टींच्या देखील किमती वाढण्यास सुरुवात झाली. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चे भाडे देखील वाढले आहे. त्यापाठोपाठ गॅसच्या किमती मध्ये देखील सातत्याने वाढ होताना दिसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचे ठरविले आहे.
आज पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यादरम्यान इंधन दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार विधानभवनात सायकल वरून येणार आहेत.
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार सकाळी १० वा. मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या चुकीच्या पावलांमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. जीएसटी व नोटबंदी यानंतर अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक कंपन्या बंद पडल्या तर अनेकांच्या नोकऱ्याही केल्या. त्यातच कोरोनामुळे देखील अनेक लोकांचे रोजगार गेले तर वेतन कपात देखील झाली. असे असताना केंद्र सरकार इंधनात दरवाढ करत आहे. इंधनावर लावलेल्या करामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य जनतेवर अशा अन्यायकारक इंधन दरवाढीमुळे आणखीन प्रभाव पडत आहे. अन्यायकारक इंधन दरवाढ सरकारने मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. यासाठीच आज काँग्रेसकडून हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी
केंद्र सरकारने २००१ ते २०१४  या १४ वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये याचे नाव बदलून सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड करुन १ रूपयांवरून तो १८ रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी असून केंद्रातील भाजप सरकारने ती थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री व आमदार सायकलने प्रवास करून विधानभवनात पोहोचणार आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा