वाघोली, दि. १५ जुलै २०२०: वाघोली व परिसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढते मृत्यूचे आकडे लक्षात घेता भविष्यात कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाघोलीत इलेक्ट्रिकल शवदाहिनी बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व वाघोली रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांनी दिली. यासाठी १४ वा १६ वित्त आयोग व २५% ग्रामनिधीतून खर्च केला जाणार आहे.
जुलै महिन्यामध्ये केवळ वाघोलीतच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या मृत्यू मध्ये देखील वाढ होत असल्याने कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाघोली परिसरामध्ये सुविधा उपलब्ध नाही. मृतदेहाचे दहन पुणे शहरातील शवदाहिनीमध्ये करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी लागणारी कागदपत्रे व पाठपुराव्याची माहिती या प्रक्रियेतून नातेवाईकांना जावे लागते.
कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना अडचणी येत असल्याने वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, बिडिओ प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, शाखा अभियंता बाळासाहेब मखरे, वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी १४ व १५ वा वित्त आयोग व २५% ग्रामनिधीतून इलेक्ट्रिकल शवदाहिनी जलदगतीने बसविण्याची विस्तृत चर्चा झाली व परिसरातील कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किट देखील खरेदी करण्याचे आदेश देण्यात यावेत व चाचण्या वेगाने झाल्यास अशा कोरोना बाधित रुग्णांची लवकरात लवकर विलगीकरण करण्यास मदत होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे