उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये वाहन नियम मोडणार्या वाहनचालकांवर मोहीम हाती घेतली आणि ७९९ वाहनांवर एकूण १,५०४ गुन्हे नोंदवले. या कारवाईतून वाहनमालकांकडून ५६,२५,२५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला, ज्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ३०५ गुन्हे, हेल्मेट न वापरणे १६२, सीट बेल्ट न लावणे १३, अवैध विमाप्रकरणी २२९, क्षमता ओलांडलेली वाहने ७१, मोबाईलवर वाहन चालविणे २६, रिफ्लेक्टर व टेल लॅम्प नसणे ५३, दारु पिऊन वाहन चालवणे १३, ताडपत्री अच्छादन नसणे १६, काळी फिल्म लावणे ४, अनुज्ञप्ती १३२, वाहन परवाना ३३, योग्यता प्रमाणपत्र २४० आणि वायु प्रदूषण प्रमाणपत्र २०७ असे विविध उल्लंघन नोंदवले गेले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, वाहन चालवताना नियमांचे काटेकोर पालन करणे हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी नियम पाळावे, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. या मोहीमेने वाहनचालकांना जागरूक करण्यास मोठे योगदान दिले असून, प्रशासनाच्या लक्षात येते की, आता कोणत्याही प्रकारची शिथिलता चालणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे













































