पुणे शहरासाठी आनंदाची बातमी;शहरी गरीब योजनेत आता रुग्णांना हेलपाटे मारायची गरज नाही..

14
Illustrative thumbnail for the 'Urban Poor Medical Assistance Scheme' by Pune Municipal Corporation. The image features a modern hospital with digital healthcare elements, a doctor assisting a patient in a wheelchair, and another patient on a stretcher, symbolizing accessible and improved healthcare services for underprivileged citizens in Pune. The background includes futuristic medical icons, emphasizing online medical assistance.
शहरी गरीब योजनेत आता रुग्णांना हेलपाटे मारायची गरज नाही

Urban Poor Scheme Pune Online Medical Assistance: पुणे शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आवश्यक असलेले पत्र आता थेट संबंधित रुग्णालयांनाच ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारी धावपळ आणि मनस्ताप आता पूर्णपणे थांबणार आहे. ही ऑनलाइन प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित झाली आहे.

यासोबतच, महानगरपालिकेने डायलिसिस आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. या आजारांवरील उपचारांसाठी दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णांना आता प्रत्येक वर्षी दाखल्यासाठी करावी लागणारी कसरत थांबणार आहे.

पुणे महानगरपालिका गेली अनेक वर्षे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना चालवत आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ मिळतो. योजनेत सहभागी असलेल्या कार्डधारकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. तर, डायलिसिस आणि कॅन्सरच्या रुग्णांना दरवर्षी दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. महानगरपालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत उपचार घेता येतात.

यापूर्वी, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उपचाराच्या खर्चाला मान्यता मिळाल्याचे पत्र आरोग्य विभागाकडून प्रत्यक्ष दिले जात होते. आता नवीन प्रणालीनुसार, रुग्णालय प्रशासनाकडूनच खर्चाचे कोटेशन ऑनलाइन पद्धतीने महापालिकेला पाठवले जाईल. महापालिका त्याची तपासणी करून त्याच दिवशी रुग्णालयाला मंजुरीचे पत्र ऑनलाइन पाठवणार आहे. शहरात या योजनेचे सुमारे १८ हजार सदस्य असून, मागील वर्षी १५ हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला होता.

महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सजीव वावरे यांनी सांगितले की, किडनी, हृदयरोग, कॅन्सर आणि डायलिसिस यांसारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना योजनेचे कार्ड दाखवून दोन लाखांपर्यंत मदत मिळू शकते. या योजनेच्या सदस्यत्वाची मुदत एक वर्षाची असते आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आली असून, रुग्णांचे सदस्यत्व आपोआप नूतनीकरण होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहरी गरीब योजनेतील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. वेळेची आणि पैशांची बचत होणार असून, उपचारासाठी लागणारी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा