मंचर : मंचर शहरात लक्ष्मी रोड, चंद्रशेखर आण्णा बाणखेले मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, घोडेगाव रोड, या रस्त्यांवर मुख्य बाजारपेठ असल्याने शहरात खरेदीसाठी व इतर कामांसाठी आलेले नागरिक आपली वाहने निष्काळजीपणे कोठेही उभी करून इतरत्र कामानिमित्त जातात.
त्यामुळे रहदारीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी होऊन सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याने पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी या तक्रारींची दखल घेत वाहतूक कोंडी करणाऱ्या व रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांना जामर बसवून दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे.
ही कार्यवाही मंचर पोलीस ठाण्याचे ट्राफिक पोलीस डी.एस.जाधव, एस.के काळोखे, एन.बी.लोखंडे, हनुमंत शिंदे, राजू डांगे यांनी केली असून पुढेही ती सुरु असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारपेठांतील दुकानदार, चालक-मालक व व्यापारी दुकानासमोर वाहने न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच दुकाना समोर रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
खासदार कोल्हे यांच्या नावाने दमबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दंडात्मक कारवाई
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असणाऱ्या घोडेगाव रस्त्यावर युनिक ऍग्रो कंपनीची फोर्ड ही चार चाकी एम. एच १४ डी.वाय. ८०५२ ही गाडी घोडेगाव रस्त्यावर लावली असता मंचर पोलीस ठाण्याचे ट्राफिक पोलीस डी.एस.जाधव यांनी या वाहनाला जामर लावला. या वाहनाचे वाहन चालक व त्यांचा एक मित्र पोलीस व तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना खासदार अमोल कोल्हे तुम्हाला माहिती आहेत का गाडीवर कारवाई करू नका माझ्या गाडीचा फोटो किंवा व्हीडिओ कोणत्या पत्रकाराने पेपरला किंवा चैनल लावला तर महागात पडेल अशी दमबाजी संबंधित व्यक्ती पत्रकार व पोलिसांना करत होती.
मात्र पोलीस जाधव यांनी या धमक्यांना न जुमानता वाहनचालकांवर कारवाई केली आहे.