टेंभुर्णी, सोलापूर २६ मार्च २०२४ : सोलापूरच्या टेंभुर्णी तालुक्यातील माढयात, संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान जगदंबा कॉटेज व लॉजिंग शेजारी असणाऱ्या जगदंबा व्हेजिटेबल फ्रुट दुकानचे मालक राहुल पवार यांच्यावर, धीरज थोरात व इतर पाच आरोपींनी फिल्मी स्टाईलने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण राहुल पवार यांनी प्रतिकार केल्याने ते बचावले.
सदर घटनेत आरोपी आणि पवार यांच्यात झटापट सुरू होती. गोळीबारातील एक गोळी त्यांच्या मांडीत घुसली. एक जणाने कोयत्याने त्यांच्या मानेवर वार केला. हल्लेखोर त्यानंतर पळून गेले. राहुल पवार यांना जखमी अवस्थेत मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
सदर घटनेची फिर्याद स्वतः राहुल महादेव पवार वय ३५ वर्ष, राहणार महादेव गल्ली टेंभुर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली. टेंभुर्णी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी धीरज रमेश थोरात राहणार सुरलीरोड टेंभुर्णी व इतर पाच आरोपी यामध्ये सहभागी असून एक आरोपी पकडण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींचा तपास चालू आहे. तपासात दोन पिस्तूल व एक कोयता पोलिसांच्या हाती लागला आहे. उसने दिलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करीत आहेत.
आचारसंहितेच्या काळात अशी धारदार शस्त्रे समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. यापूर्वीही सावकारकीच्या अनेक घटना टेंभुर्णीमध्ये घडलेल्या आहेत. आनाधिकृत सावकारकीला चाप बसावा अशी भावना जनतेतून निर्माण झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदिप पाटील