लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लातूर पोलिस सज्ज;

लातूर, २६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडाव्या याकरिता दिनांक १ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष कारवाई मोहीम राबवून कोंबिंग ऑपरेशन, रूटमार्च, गाव भेटी, मतदान केंद्राची पाहणी, गुन्हेगार व शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार दिनांक १ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई मोहीम राबविण्यात आली. अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये जुगार मटका प्रतिबंध अधिनियमांनुसार लातूर जिल्ह्यात ३१४ व्यक्ती विरोधात १२० गुन्हे दाखल करण्यात आले असून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १९, ८७, ८२० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

देशी विदेशी दारू, हातभट्टीची वाहतूक व निर्मिती, अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या ५७५ जणांविरुद्ध तब्बल ५६७ गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास ३७ लाख ४३ हजार १८१ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. शिवाय हातभट्टी दारूचे रसायनही नष्ट करण्यात आले आहे. तसेच विविध गुन्ह्यात फरार/पाहिजे असलेल्या ५ गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.

दिनांक १ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यत लातूर पोलिसांकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील ५३ अधिकारी, २०५ पोलीस अंमलदार/होमगार्ड यांचे अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार आरोपीला अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता.

जिल्ह्यात विविध २३ ठिकाणी तसेच जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमेवर चेक पोस्ट नाकाबंदीचे आयोजन करून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली असून निवडणुका संपेपर्यंत सदरचे चेक पोस्ट व नाकाबंदी पॉईंट कार्यान्वित राहणार आहेत.

पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांना चेक करून मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या, शांतता बाधित करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली असून यामध्य फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १०७ अन्वये शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कलम ११० अन्वये अनेक गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. दखलपात्र गुन्हा/अपराध होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी फौजदार प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुटख्याची अवैध विक्री साठवणूक वाहतूक करणाऱ्या १३ व्यक्ती विरोधात १२ गुन्हे दाखल करून ६५ लाख ३२ हजार प्रतिबंधित गुटखा व इतर सामग्री जप्त करण्यात आलेली आहे.

मालमत्तेविषयक व शरीराविषयी गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे दोन प्रस्ताव तयार करून ६ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे.

सामाजिक शांततेला धोका असलेल्या सराईत गुन्हेगार विरुद्ध कारवाई करत एम.पी.डी.ए. खाली एका आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून मागील दीड वर्षाच्या कालावधीत एकूण सहा व्यक्तीं विरोधात स्थानबद्ध ची कारवाई करण्यात आलेली आहे.

लातूर जिल्हा पोलीस कडून शक्तिप्रदर्शन करीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक गावात पोलीस दलातर्फे मोठ्या संख्येने दंगा काबू पथक, शीघ्र कृती दल, चार्ली पोलीस पेट्रोलिंग यांच्यासह पोलीस अधिकारी व अमलदारांचा समावेश असलेले रोडमार्च काढण्यात आले. सदरच्या प्रभावी रोडमार्चमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे हाताळण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.

लातूर पोलिसांचे सायबर मॉनिटरिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग, गोपनीय माहिती विभाग प्रभावीपणे कार्यान्वित करून त्या आधारे सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर, पोस्ट वायरल करून समाजात अशांतता पसरविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत असून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे धार्मिक द्वेष पसरविला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणूक-२०२४ शांततेत, निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सक्षम असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा