पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार काम करण्याच्या सूचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल प्रिन्सिपल बॅच नवी दिल्ली, यांच्या आदेशान्वये मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, जलप्रदुषण, जैव विविधता व जलविज्ञान या बाबींवर सनियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ, निरी संस्थेचे डॉ. रितेश विजय, जलसंपदा विभागाचे अधिकारी पी. के. शेलार, विभागीय आयुक्त कार्यालयाचे नगर प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, जैवविविधता तज्ज्ञ डॉ. बेनाईमीन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकारी एस. डी. जाधव, पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, ॲङ श्रीजा चक्रवर्ती, मैत्रेया घोरपडे उपस्थित होते.
या बैठकीत महामेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व जलप्रदुषण बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या हरकती ऐकून घेण्यात आल्या. तसेच पर्यावरणाचे सर्व निकष व नियम पाळून महामेट्रोचे काम वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला महामेट्रो, जलसंपदा विभाग, प्रदुषण नियंत्रण महामंडळ, पर्यावरण तज्ज्ञ, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.