पुणे, २५ नोव्हेंबर २०२२ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगत गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर आता २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने विक्रम गोखले यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत आणि हात-पाय हलवत आहेत. पुढील २४ तासांत त्यांचे व्हेंटिलेटर सपोर्ट निघू शकेल. तसेच त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे.
यापूर्वी गुरुवारी दीनानाथ रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले होते की, श्वसनाचा त्रास होत असल्याने विक्रम गोखले यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.