विरोधी बाकावर बसण्याआधीच राऊतांचा मोदींना टोला

मुंबई: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राऊत हे दिल्लीमध्ये आहेत. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन सकाळी आठच्या सुमारास एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी “तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था”, या हबीब जालिब यांच्या कवितेती ओळी पोस्ट केल्या आहेत. तुमच्याआधी येथे जो सत्ताधारी होता तो ही स्वत:ला देव समजायचा असंच राऊतांना या ट्विटमधून सूचित करायचे आहे. आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राऊतांबरोबर शिवसेनेच्या सर्व खासदारांना विरोधकांच्या बाकड्यावर बसावे लागणार आहे. त्यावरुनच त्यांनी सत्ताधाऱ्यांना हा टोला लगावला आहे.
भाजपाकडून करण्यात आलेल्या घोषणेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. “शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते,” अशी बोचरी टीका राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली. “जॉर्ज फर्नाडीस हे शेवटचे निमंत्रक होते. त्यानंतर कुणीच झाले नाही. सध्या एनडीएचे नेते कोण आहेत? कुणाच्या सहीने शिवसेनेला बाहेर काढले?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा