नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2021: वसुली प्रकरणात फरार असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अटकेपासून दिलासा मिळावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली. न्यायालयाने परमबीर सिंग यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत संरक्षण मिळणार नाही, असं कोर्टाने सांगितलं. तर, मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली तर मी खड्ड्यातून बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंग यांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून सिंग यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, आरोपी अद्याप तपासात सहभागी झालेला नाही, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. ते कुठे आहेत याची हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही. यामुळे या प्रकरणी कोर्टात सुनावणी होऊ शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल कोर्टाने केला. जस्टिस संजय किशन कौल यांनी हा सवाल केला. तुम्ही कोणत्याच चौकशीत सामिल झाला नाहीत. तरीही तुम्हाला संरक्षणाचा आदेश हवा आहे. आमची शंका चुकीची असू शकते, पण तुम्ही जर परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे