मुंबई, ८ सप्टेंबर २०२२ : मनी लाँड्रिंग आरोप प्रकरणात एक महिन्याहून अधिक काळापासून न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अखेर बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर आज, गुरुवारी न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
१०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. ८ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना २२ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयानं त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सध्या संजय राऊत हे अर्थर रोड जेलमध्ये आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुनावणी झाल्यास आज तरी त्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव