पुणे: व्हिस्की पिण्याची इच्छा झाली. ती पूर्ण कशी करणार कारण रात्री दारूची दुकाने बंद झाली होती.त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देऊन घरपोच व्हिस्कीची बाटली मागवली. परंतु डिलिव्हरीचे पैसे देताना मात्र डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून २६ हजार ६५२ रुपये काढून घेण्यात आले.असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी महम्मदवाडी, हडपसर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रात्री व्हिस्की पिण्याची इच्छा झाली. त्याने गुगलवर कोणते वाइन शॉप सुरु आहे. याची माहिती घेऊन मगरपट्टा येथील सनी वाइन शॉप येथे संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने दुकान बंद झाल्याचे सांगितले. परंतु, होम डिलिव्हरी मिळेल असे सांगितल्यावरून फिर्यादीने ऑर्डर दिली.
फोनवरील अनोळखी व्यक्तीने पेमेंट करण्यासाठी डेबिटकार्ड आणि मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक याची माहिती फिर्यादीकडून काढून घेतली. त्यानंतर लगेचच फिर्यादीच्या बँक खात्यामधून २६ हजार ६५२ रुपये काढून घेण्यात आले. पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर फिर्यादीने त्वरित संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता फोन बंद झाल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वानवडी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील पुढील तपास करीत आहेत.