पुणे विभागातील १६ रेल्वे स्थानकांचा लवकरच होणार कायापालट! (अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा)

15

पुणे १७ फेब्रुवारी २०२५ : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील १६ स्थानकांच्या विकासकामांना वेग आला असून, लवकरच या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या कामांपैकी दोन स्थानकांची कामे ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित १४ स्थानकांची प्रगती ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत योजनेतून पुणे विभागातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे. तसेच, दौंड-मनमाड लोहमार्गाचा समावेश पुणे विभागात झाल्यामुळे या मार्गावरील बेलापूर, कोपरगाव आणि अन्य स्थानकांचाही विकास करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्थानकांचे सुशोभीकरण, प्रवेशद्वारांसाठी पोर्च उभारणे, फलाटांची उंची वाढविणे, सरकते जिने व लिफ्ट बसविणे, प्रतीक्षागृह आणि स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करणे, आधुनिक फर्निचर बसविणे आणि प्रवाशांसाठी १२ मीटर रुंद पादचारी पूल उभारणे अशी महत्त्वपूर्ण कामे होत आहेत.

बेलापूर, कोपरगाव स्थानकांची कामे वेगात

एप्रिल महिन्यात दौंड-मनमाड लोहमार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील स्थानकांच्या विकासाला अधिक चालना मिळाली आहे. सध्या बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांची कामे जलदगतीने सुरू असून लवकरच ती पूर्णत्वास जाणार आहेत.

प्रगतीपथावर स्थानकांचे सौंदर्यीकरण

विकासकामांमुळे स्थानकांचे संपूर्ण रूप पालटणार असून, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील. तळेगाव, चिंचवड, उरळी, केडगाव, लोणंद, सातारा आणि बारामती स्थानकांवरील कामे मोठ्या जोमाने सुरू असून, त्यांची प्रगती ५० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास अनुभव उपलब्ध होईल. त्यामुळे या योजनेमुळे रेल्वे प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा