नाशिक, २९ सप्टेंबर २०२३ : नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जन दरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी आतापर्यंत दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, तर दोघांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी सायंकाळी नाशिकमधील गाडगे महाराज पुलाजवळील गोदावरी नदीच्या घाटावर, गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी दोन तरुण पाण्यात शिरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. महापालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागही सध्या बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहे.
अशाच एका दुसऱ्या घटनेत नाशिकच्या वालदेवी धरणात गणेश विसर्जनासाठी आलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास येथे दोन मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी नागरिकांना अत्यंत सावधगिरीने गणपती विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड