हाँगकाँग, दि. १० जून २०२०: ईडीने हिरा उद्योगपती नीरव मोदी आणि मेहुल चोकसी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी भारतातून कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळ काढला होता. ईडीने हाँगकाँग मधून निरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या मालकीचे १३५० कोटींचे हिरे, मोती आणि दागिने भारतात आणले आहेत.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळे करून नीरव मोदी आणि मेहुल चोकसी देश सोडून पळून गेले आहेत. ईडी या दोघांविरोधात सातत्याने कारवाई करीत आहे आणि त्यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न देखील करत आहे. दरम्यान, ईडीने हाँगकाँगच्या कंपन्यांकडून १३५० कोटी रुपयांचे हिरे, मोती, दागिने परत आणण्यासाठी कारवाई केली आहे.
भारतात परत आणलेल्या १०८ कंसाइनमेंट पैकी ३२ नीरव मोदी आणि ७६ मेहुल चोकसीच्या आहेत. यापूर्वीही ईडीने नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या दुबई आणि हाँगकाँगमधून ३३ कंसाइंटमेंट भारतात परत आणल्या ज्याची किंमत १३७ कोटी होती. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात आहे आणि मेहुल चोकसी याने अँटिगाचे नागरिकत्व घेतले आहे आणि तिथेच लपला आहे. दोन दिवसांपूर्वीच ८ जून रोजी मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने नीरव मोदी यांच्या १४०० कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी