सिंधुदुर्ग, दि. १० जुलै २०२०: येत्या २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा बहुचर्चित सण म्हणजे गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सव म्हटले की कोकण सर्वात चर्चित आहे. पुणे आणि मुंबई येथे गणेशोत्सव धुमधडाक्यात जरी साजरा केला जात असला तरी कोकणात मात्र गणेशोत्सवाची एक वेगळीच ओढ आहे. बाप्पा येत आहे या कारणास्तव मुंबई पुण्यामध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांची ओढा कोकणाकडे जाण्यासाठी लागली आहे. मात्र यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे दक्षता घेणे देखील आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर परजिल्ह्यांतून येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्टपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश देण्याची भूमिका जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे.
याबाबत एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की, ७ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्गात आल्यानंतर विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याबरोबरच ई-पास नसलेल्या वाहनांना प्रवेश नाकारला जाईल. मात्र, हा निर्णय अंतिम नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वांमध्ये मात्र कोविड -१९ चे संकट पाहता गणेश मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले आहे.
रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील लॉक डाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी घेतला होता. मात्र सततच्या लॉक डाऊन मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे घेतलेल्या या निर्णयाचा विविध भागातून तीव्र विरोध करण्यात आला होता.
नागरिकांकडून झालेल्या विरोधानंतर घेतलेला हा निर्णय मागे घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यतील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतील दुकाने खुली ठेवण्यासाठी आराखडा मंजुरीबाबतचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक दिवसाआड डाव्या-उजव्या बाजूची दुकाने खुली राहतील. रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी