पाटणा, २६ सप्टेंबर २०२०: सायको किलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अविनाश श्रीवास्तव याला अखेर अटक करण्यात आलीय. बुधवारी रात्री ११.३० वाजता पटना पोलिसांनी रक्सौलच्या मेन रोडवरील हॉटेलमधून त्याला अटक केली. प्रभात खबर या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अटकेच्या वेळी अविनाश श्रीवास्तव त्याच्या आईसमवेत होता. दोघे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी पाटणा पोलिसांच्या कक्षानं त्याला पकडलं व तिथून त्याला पाटण्यात पाठविलं.
वास्तविक, आपल्या पिस्तूलमधून बिहारमध्ये २० खून करणारा अविनाश श्रीवास्तव उर्फ अमित हा माजी एमएलए सी ललन श्रीवास्तव यांचा मुलगा आहे. अविनाश हा राजधानी पाटण्यातील कांकरबाग पोलिस स्टेशन परिसरातील एमआयजी कॉलनीचा रहिवासी आहे. बिहारमध्ये तो सायको किलर म्हणून ओळखला जातो. ब्रस्ट फायर मारणारा गोरखपूरचा श्रीप्रकाश शुक्ला नंतरचा हा दुसरा गुन्हेगार आहे.
वडिलांच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या जगात प्रवेश:
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथून एमसीए केल्यानंतर इन्फोसिस कंपनीत नोकरी करणारा अविनाश त्यावेळी गुन्हेगारी क्षेत्रात आला जेव्हा २००२ मध्ये हाजीपुरात त्याचे वडील व तत्कालीन आमदार सी. लालन श्रीवास्तव यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. अविनाशच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो दोषींना शोधु लागला.
२००३ मध्ये आपल्या वडिलांचा मारेकरी असलेल्या पप्पू खान याला हाजिपूर इथं ३२ गोळ्या घालून ठार केलं. येथून त्याचं नाव सायको किलर असं ठेवलं गेलं. त्यानं वडिलांच्या मारेकऱ्यांची निवड केली. वृत्तानुसार, हाजीपुरात एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर अविनाश त्याच्या मृतदेहाजवळ तीन तास बसून राहिला आणि दर मिनिटाला मृतदेहावर एक गोळी झाडात राहिला.
२०१६ मध्ये, जेव्हा वैशालीच्या एसपींनी अविनाशला विचारपूस केली तेव्हा त्यानं पाटण्यात २० खून केल्याची कबुली दिली. अलीकडंच तो हाजीपूर कारागृहातून सुटला आहे. कारागृह सोडल्यानंतर तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या मनस्थितीत होता. पाटणा पोलिसांना याची माहिती मिळाली. यानंतर बुधवारी रात्री पाटणा पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि रक्सौल येथून त्याला पकडलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे