गुळुंचे येथील सरपंच व ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

फौजदारीचा तपास पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे

पुरंदर दि.२६ सप्टेंबर २०२०: सरकारी दस्तऐवज बेकायदा पद्धतीने नोंद केल्याचा तसेच शासन निर्णयाच्या विरुद्ध कामकाज केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सरपंच संभाजी कुंभार व ग्रामसेवक जयेंद्र सुळ यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची तक्रार पुरंदर तालुका युवक शाखेचे उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्याप्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ही चौकशी सोपविली आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येणार आहे.

येथील ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी २६ अतिक्रमणे नवीन असल्याचे नमूद करत त्यांची नमुना ८ ला नोंद घेतली. यातील २ घरे प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्यांची नोंद घेण्यात आली. त्यामुळे घरे चोरीला गेल्याची तक्रार निगडे यांनी पोलिसात दिली. सरपंच कुंभार यांच्या आई द्वाराकबाई कुंभार यांचे अतिक्रमण ऑनलाईन प्रणालीत नियमित करण्यासाठी घेण्यात आले. प्रत्यक्षात निवासी अतिक्रमण नियमित करणे क्रमप्राप्त असतानाही पड अतिक्रमण नियमित करण्यासाठी घेण्यात आले. ग्रामसेवकांनी नियमाप्रमाणे स्थळपाहणी केली नाही. काही नवीन अतिक्रमणाचा समावेश २०११ पूर्वीच्या अतिक्रमणात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याची तक्रार निगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, प्रत्यक्षात घरे नसतानाही त्यांची खोटी नोंद घेऊन सरकारी कागदपत्रे बनावट करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. प्रत्यक्षात पोलीस तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे कानाडोळा केला आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने दोषींना शिक्षा मिळत नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता या प्रकरणात गटविकास अधिकारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश देतात अन्यथा कसे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने चुकीचे दस्तऐवज बनवले आहेत. घरे अस्तित्वात नसतानाही त्यांची नोंद घेण्याचा पराक्रम केला आहे. सरपंच यांनी पदभार स्वीकारताच स्वतःच्या कुटुंबियांचे अतिक्रमण काढणे न्यायोचित असतानाही नियम धाब्यावर बसवत अपात्र अतिक्रमण पात्र करण्यासाठी बनवाबनवी केली आहे. न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू.” – अक्षय निगडे, उपाध्यक्ष, रायूकाँ.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा