बारामती, १९ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर अनेक भागात पाण्याची तळी साचली होती. तसेच माळावरच्या देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वीर सावरकर जलतरण तलावसमोर पाणी साठले आहे. आज सहा दिवस उलटुन देखील पाणी कमी झाले नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या नवरात्र सुरू आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे देवीचे मंदिर न उघडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नाहीतर नागरिकांना या रस्त्यावरून जाणे फार जिकिरीचे झाले असते.
बारामती शहरातील झालेल्या मूसळधार पावसाने अनेक भाग पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः भिगवंन रोडवर तर बुधवारी रात्री तेथील अतिक्रमणामुळे अनेक नगरात पाणी साचल्याने चारचाकी वाहने बुडल्याचे चित्र होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील पाणी साचलेल्या भागाची पाहणी केल्यावर तेथील असणारे अतिक्रमण पवार यांनी स्वतः उभे राहून तोडायला लावली आहेत. जलतरण तलावसमोर सचलेले पाणी जाण्यासाठी आउटलेट नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा पालिकेने बांधलेल्या पदपथाला देखील पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवला नाही, तर येथील रहिवाश्यांनी पाणी आपल्या भागात येऊ नये म्हणुन रस्त्याच्या कडेला चढ केले असल्याने व रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकामुळे पाणी साचून राहते आहे.
सध्या असणाऱ्या कोरोना संसर्ग व या साचलेल्या पाण्याने डेंग्यू व गोचिडतापाचे रुग्ण वाढल्यास नवल वाटायला नको. या भागात रहिवासी संख्या जास्त असल्याने साचलेले पाणी तेथील नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याला वाट करून द्यावी अशी येथील परिसरातील रहिवाश्यांनी मागणी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव