नवी दिल्ली, २ मार्च २०२१: देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड१९ प्रतिबंधक लसींच्या मात्रांच्या संख्येने काल १.४७ कोटींचा टप्पा ओलांडला. या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी २०२१ रोजी झाला होता आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी (एफएलडब्लू) २ फेब्रुवारी २०२१ पासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्याची काल सुरुवात झाली.
काल कोविन पोर्टलवर २५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यापैकी २४.५ लाख लाभार्थी सर्वसामान्य नागरिक आहेत तर उर्वरित लाभार्थी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी आहेत.
काल सर्वसामान्य नागरिकांपैकी ६.४४ लाख लाभार्थींनी भेटीची वेळ निश्चित केली. काल मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण १,४७,२८,५६९ मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ६६,९५,६६५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या २५,५७,८३७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या विविध आघाड्यांवरील ५३,२७,५८७ कर्मचाऱ्यांचा, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १,२८,६३० लाभार्थ्यांचा आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील १८,८५० लाभार्थ्यांचा समावेश आहे.
काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसीकरणाच्या ४५व्या दिवशी लसींच्या ४,२७,०७२ मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ३,२५,४८५ लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या १,०१,४८७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे