आज जागतिक प्राणी दिन. खरे तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच. मात्र माणूस आता जास्त स्वार्थी झालाय त्यामुळे हल्ली प्राणी पाळणे केवळ शौक किंवा फॅशन बनलीय.
‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ असे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आपण आता विसरत चाललो आहोत. चला आज प्राणी दिनानिमित्त एक संकल्प करूया ‘त्यांना’ त्रास होईल असं आपण काहीच करणार नाही. कायद्याच्या किंबहुना माणुसकीच्या कसोटीतून त्यांच्यावर प्रेम करूयात…
अशी झाली सुरुवात : 1931 साली इटली येथे एक परिषद भरविण्यात आली. त्याचा उद्देश म्हणजे नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीवर लक्ष देऊन त्यांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देणे हा होता. त्या दिवसापासून 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.
निसर्गातील प्राण्यांचे रक्षण करताना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून या दिवसाला जागतिक प्राणीप्रेमी दिवस म्हणूनही संबोधले जाते.
4 ऑक्टोबरच का? : पर्यावरण रक्षण आणि प्राण्यांचे पोषण यासाठी आयुष्य वेचणाऱ्या संत फ्रान्सिस यांचा 4 ऑक्टोबर हा उत्सव दिन आहे. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.
हे थांबवा : जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, वेगवेगळे प्रयोग, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे, प्राण्यांपासून विविध वस्तू बनविणे, झुंज लावणे, तस्करी अशा प्रकारे प्राण्यांचा छळ होताना जर आपल्याला दिसत असेल तर ते वेळीच थांबवा कारण तो हि एक जीवच आहे.
चला सर्वांनी मिळून आजूबाजूच्या असणाऱ्या किंवा घरात असणाऱ्या पाळीव प्राण्यांची योग्यप्रकारे काळजी घेऊया. त्यांना प्रेम देऊयात, त्याचं प्रेम मिळवूयात…