गुजरात, 26 डिसेंबर 2021: पाकिस्तानातील कराची येथून 400 कोटी रुपयांचे अमली पदार्थ नुकतेच गुजरातमध्ये एटीएसच्या पथकाने पकडले. याप्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. कराचीचा मोठा ड्रग माफिया हाजी हसन याचा मुलगा साजिद पाकिस्तानच्या बोटीत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या पंजाबच्या एका मोठ्या गुंडाचे संबंध असल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. आता पोलीस या गुंडाला प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन नवा खुलासा करण्याच्या तयारीत आहेत.
अलीकडेच गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाच्या पथकाने पाकिस्तानातील कराची येथून अल हुसैनी नावाची बोट पकडली. या बोटीतून 400 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 6 पाकिस्तानींना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या पाकिस्तानी साजिदने तो मच्छीमार नसून कराचीतील ड्रग माफिया हाजी हसनचा मुलगा असल्याचे उघड केले आहे.
हाजी हसन हा कराचीत बसून अल हुसैनी बोटीने ड्रग्ज भारतात पाठवत होता. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या अफूची शेती करणारे आणि अफगाणिस्तानचे ड्रग माफिया यांना तालिबान सरकार येण्याची भीती आहे. अफगाणिस्तानातील अफूची शेती आणि ड्रग सिंडिकेट लवकरच तालिबान ताब्यात घेतील अशी भीती ड्रग माफियांना वाटत आहे.
तालिबानच्या दहशतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हद्दीत अमली पदार्थांची तस्करी सातत्याने वाढली आहे. अफगाणिस्तान-कराची आणि गुजरात मार्गांचा वापर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या 400 कोटींच्या अमली पदार्थ जप्तीत पंजाबच्या एका मोठ्या गुंडाचे नाव समोर आले आहे, जो सध्या राजस्थानच्या तुरुंगात आहे. हे ड्रग्स पंजाबमध्ये पोहोचवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे