नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2022: भारतीय गुप्तचर यंत्रणांना डी-गँगच्या कटाची खबर मिळाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख केलाय. एनआयएच्या म्हणण्यानुसार, डी-गँगचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केलीय. ज्यांचं टार्गेट मोठे नेते आणि सेलिब्रिटी आहेत.
हिंसाचाराला खतपाणी घालणं हा हेतू
एफआयआरनुसार दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे आहेत आणि त्याचे लक्ष दिल्ली आणि मुंबई आहे. इथले बडे नेते आणि बडी व्यक्तिमत्त्वे त्यांचे टार्गेट आहेत. स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या या युनिटच्या माध्यमातून दाऊदला भारतातील अनेक भागात हल्ले करायचे आहेत. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश भारताच्या विविध भागात हिंसाचार भडकावण्याचा आहे.
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला एनआयएच्या खुलाशाच्या एक दिवस आधी शुक्रवारी ईडीने ताब्यात घेतलं आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात, ईडी इक्बालची पुढील 7 दिवस म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत चौकशी करेल. ईडीने अलीकडेच दाऊद आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. ईडीच्या म्हणण्यानुसार हे लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवत आहेत.
इक्बालने गुंडाकडं केली होती पैशांची मागणी
ईडीचे सहाय्यक संचालक डीसी नाहक यांनी सांगितले की, सप्टेंबर 2017 मध्ये एका बिल्डरच्या तक्रारीवरून इक्बाल कासकर, मुमताज अजाज शेख, इसरार जमील सय्यद आणि इतर काही जणांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इक्बाल आणि इतरांनी त्याच्याकडून वसुलीची रक्कम मागितल्याचे एका बिल्डरनं तक्रारीत म्हटलं आहे. 2015 मध्ये बिल्डरचा एक दलाल सय्यदला भेटला. तो दाऊदचा भाऊ असल्याचे सय्यदने सांगितलं होतं. त्याने इक्बालला बिल्डरशी बोलायला लावले आणि वसुलीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
गॅलेंट्री अवार्ड मिळालेल्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी हिमाचलचे आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली. नोव्हेंबर 2021 मध्ये एजन्सीने नोंदवलेल्या OGW नेटवर्क प्रकरणासंदर्भात नेगी यांना अटक करण्यात आली आहे. जवळपास वर्षभर ते एजन्सीच्या रडारवर होते. लष्कर-ए-तैयबा या गटाच्या हुर्रियत दहशतवादी निधी प्रकरणाच्या चौकशीसाठी अरविंद यांना 2017 मध्ये शौर्य पुरस्कार (गॅलेंट्री अवार्ड) मिळाला.
लष्कराच्या छावणीत तैनात होता पाकिस्तानी गुप्तहेर
राजस्थानमधील नसीराबाद आर्मी कॅम्पमधून पाकिस्तानी गुप्तहेर मोहम्मद युनूसला अटक करण्यात आली आहे. हा गुप्तहेर पार्किंगमध्ये स्लिप कटिंगचे काम करायचा. आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डावपेचांची माहिती पाकिस्तानला पाठवत असे आणि त्याबदल्यात पैसे मिळवायचा. आयबीने निरीक्षण केलं असता आरोपीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. ताब्यात घेतल्यानंतर जयपूर मुख्यालयात त्याची चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे