पुणे, ९ सप्टेंबर २०२२: राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळं गणेशोत्सव साजरा करता आला नाही. पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध लावले नाहीत. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आज गणेश विसर्जनानिमित्तही आता शहरं सजली आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात गणपती दर्शनं घेत आहेत.
आज दिवसभर अजित पवार पुण्यातल्या विविध गणपतींचं दर्शन घेणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलतात की, उद्धव ठाकरेंचं सरकार जरी असतं तरी गणेशोत्सव निर्बंधमुक्त केला असता. पण त्या वेळी माणसं जगवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे निर्बंध लावले होते. स्वतः पंतप्रधान मोदींनी ही लॉकडाऊन जाहीर केला होता. दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात केरळमध्ये संख्या जास्त होती. ही संख्या आटोक्यात आणायची म्हटलं तर निर्बंध लावावे लागत होते, म्हणून ही बंधनं होती. पण आता ही नियम काढली आहेत. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढायची काहीही गरज नाही.
गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर त्याच्याकडे काय मागितलं? असा प्रश्न त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता त्यांनी आपल्या विशेष शैलीत उत्तर देत बोलतात की प्रत्येक वेळी गणपतीचं दर्शन घेतलं की काहीतरी मागितलं पाहिजे असं आहे का ? सारखं सारखं त्यांना साकडं घालण्यात काही अर्थ नाही, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे