मुंबई, १४ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन या कंपनीने आपला प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला हलवला. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या आरोपाने राज्यात राजकीय धुरळा उडाला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरोपांची राळ उडवली. त्यांच्या आरोपामुळे राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. याला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलती द्यायला हव्या होत्या त्या दिल्या होत्या. आता कंपनीने घेतलेल्या निर्णयावर केंद्र सरकार आणि कंपनीच्या मालकांशी चर्चा करून, वेदांता कंपनी पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वेदांता कंपनीच्या विषयी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. हा प्रकल्पा राज्यात झाला असता तर सुमारे एक लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. मागच्या महिन्यापर्यंत कंपनी महाराष्ट्रात येणार असे सांगितले जात होते. परंतु ही गुंतवणूक राज्यातून नेमकी का निघून गेली ते या सरकारने स्पष्ट करावे. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा पूर्ण झाली होती. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या क्षणी का गुजरातला निघून गेली? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. सध्याचे राज्य सरकार हे खोके सरकार आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात आणला. परंतु तो आता इतर राज्यात गेला आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार वर केली.
आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलती द्यायला हव्या होत्या त्या दिल्या होत्या. परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा पाठपुरावा घेतला गेला नाही. कंपनीने घेतलेल्या निर्णयानंतर आता याबाबत, केंद्र सरकार आणि कंपनीचे मालक अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करून हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर