गोवा, १४ सप्टेंबर २०२२: राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन लोटस हे गोव्यात यशस्वी झालं आहे. गोव्यात अखेर काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलं असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या एका वर्षाच्या आत मध्ये गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. गोवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ पाहता आता विरोधी पक्ष नेताच असणार नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
रमेश तवडकर म्हणाले, काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेतलं त्यांच संख्याबळ पाहता विरोधी पक्ष नेताच असणार नाही, आता काँग्रेसकडं पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे यापुढे त्यांचा विरोधी पक्ष नेता असणार नाही, पण या संदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचं स्पष्ट मत तवडकर यांनी व्यक्त केलं आहे. तवडकर पुढे म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यात गोवा विधानसभेचा अधिवेशन होणार असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अंतिम निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी सकाळी केलेल्या ट्विट मध्ये केलेल्या दाव्या नंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सदानंद तावडे यांनी केला होता. त्यानंतर गोव्यात काँग्रेसला मोठा हादरा बसणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यानुसार आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुका आधी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. या दरम्यान काँग्रेसच्या ८ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. भाजपमध्ये सामील होणाऱ्या आमदारांमध्ये माझी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही सहभाग होता. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात. त्यांनीही काँग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठा धक्काच बसला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे