पुणे, २ ऑक्टोबर २०२२ : पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील चांदणी चौक येथील वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरणारा पूल अखेर आज रात्री भुईसपाट करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने अवघ्या काही सेकंदामध्ये हा पूल पाडण्यात यश आले आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर २.३३ वाजेच्या सुमारास पूल स्फोटकांच्या साहाय्याने पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर पडलेला राडारोडा उचलून आज सकाळी दहाच्या दरम्यान वाहतूक सुरू करण्यात आली.
पूल पाडण्याची प्रक्रिया पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी ते स्वत: नियंत्रण कक्षात हजर होते. पुलाचे पाडकाम करण्यासाठी पुलाला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० होल घेण्यात आले होते. यामध्ये ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. १ हजार ३५० डीटोनेटरचा वापर नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आला. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी करण्यात आली.
पूल पडताना सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. पुलाचे पाडकाम होताना ब्लास्ट झाल्यावर तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आले होते. या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुलापासून २०० मीटर परिघातील इमारतीमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.
चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी आणि राडारोडा हलवून मार्ग मोकळा करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली. सोळा एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, तीस टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, दोन अग्निशमन वाहन, तीन रुग्णवाहिका, दोन पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण दोनशेदहा कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले होते.
यावेळी सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून एकूण तीन पोलीस उपायुक्त, चार सहायक आयुक्त, एकोणीस पोलीस निरीक्षक, सेहेचाळीस सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर