रत्नागिरी, १४ जानेवारी २०२३ : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त सहकार्याने पहिल्या सागर महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन, संचालक सी.ए. नितीन करमरकर, सी.ए. पुरुषोत्तम पेंडसे, समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. सुनील डामरे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सिंह म्हणाले, की महासागरांनी जगाचा ७० टक्के भाग व्यापला आहे आणि महासागर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सुमारे ९५ टक्के खोल महासागर असे आहेत की त्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. लोह, मॅंगनीज, निकेल आणि कोबाल्ट अशी खनिजद्रव्ये समुद्रात आहेत. ५० टक्के ऑक्सिजन समुद्रातून तयार होतो. कार्बनडाय ऑक्साईडचे नियंत्रण समुद्र करतो. जैवविविधता समुद्रामुळे टिकून आहे. समुद्रातील द्रव्यांचा उपयोग औषधी, कॉस्मेटिक बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मत्स्यखाद्यावर बरेचसे जग अवलंबून आहे. त्यावर अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. दैनंदिन जीवनात आपण समुद्राशिवाय जगू शकत नाही. भारतातील माॅन्सून समुद्रावर अवलंबून आहे. समुद्र सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. पृथ्वीच्या वातावरण बदलांचे चक्र समुद्रावरच आधारलेले आहे. वातावरणातील वाढते तापमान समुद्र पुन्हा पुन्हा नियंत्रित करीत असतो. हे चक्र बिघडले तर बर्फ वितळू लागेल, उष्णता वाढेल आणि जगणे मुश्किल होऊन जाईल.
प्रास्ताविकामध्ये नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले, की आसमंतने गेल्या ११ वर्षांत निसर्ग संवर्धन, विद्यार्थी आणि शास्त्रीय संगीत याविषयीचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हा पहिला सागर महोत्सव आहे. या माध्यमातून समुद्राविषयी जनजागृती करण्याचे काम करुत आहोत. डॉ. गुरुदास नुलकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारत आहे.
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, की समुद्र सखा आहे. त्यामुळे त्याला वाचविले पाहिजे. ही जबाबदारी मानवाचीच आहे. अनेक धातू, द्रव्ये, सुंदर जैवविविधता, जलचर प्राणी समुद्रात आहेत. विद्यार्थी व समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांनी आणि सर्वांनीच समुद्र वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मान्यवरांचा सत्कार पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन नंदकुमार पटवर्धन यांनी केला. आरजे दुहिता सोमण-खेर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विवांत मुंबईचे डॉ. संजीव शेवडे, कोस्टल कॉन्झर्वेशन मुंबईचे प्रदीप पाताडे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, संशोधक पुणे, मुंबईसह विविध भागांतून आले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे